संतापजनक! औरंगाबादेत वृद्धेला झाडाखालीच ऑक्सिजन लावले
औरंगाबाद: आरोग्य यंत्रणेची अब्रु वेशीवर टाकणारी एक धक्कादायक घटना औरंगाबदमध्ये घडली आहे. औरंगाबादमध्ये कोविड सेंटरमध्ये खाटा रिकाम्या असतानाही एका करोनाबाधित वृद्ध महिलेला चक्क झाडाखाली ऑक्सिजन लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या वृद्धेचा झाडाखाली ऑक्सिजन लावलेला फोटोही व्हायरल झाला आहे. या धक्कादायक प्रकारावर औरंगाबादकरांनी संताप व्यक्त केला असून संबंधित डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर कारवाईची करण्याची मागणी होत आहे. औरंगाबादच्या वाळूजमधील गरवारे कम्युनिटी सेंटरमध्ये शनिवारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका ६७ वर्षीय वृद्धेला करोनाची लक्षणं जाणवल्याने तिला गरवारे कम्युनिटी सेंटरमध्ये आणण्यात आले होते. मात्र, कम्युनिटी सेंटरमध्ये ४० खाटा रिकाम्या असूनही या वृद्ध महिलेला सेंटर बाहेरच्या झाडाखाली बसवण्यात आले. या महिलेच्या शरीरात प्राणवायुचे प्रमाण ८२ टक्के असल्याने तिला वृद्धेला झाडाखाली बसवूनच ऑक्सिजन लावण्यात आले. याबाबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या धक्कादायक प्रकारावर सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले. त्यामुळे या वृद्धेला तातडीने गंगापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, या प्रकारावर भाजपने तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. औरंगाबादमधील कोविड सेंटरमध्ये खाटा रिकाम्या असताना रुग्णांवर झाडाखाली उपचार होतातच कसे?, असा सवाल भाजपचे आमदार अतुल सावे यांनी केला आहे. या महिलेला घाटी रुग्णालयात आणून तिच्यावर उपचार का करण्यात आले नाहीत?, असा सवाल करतानाच हा अब्रु वेशीवर टांगण्याचा प्रकार असल्याची टीकाही सावे यांनी केली आहे. दरम्यान, या महिलेला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना जागेवरच ऑक्सिजन लावण्यात आला. त्यानंतर तात्काळ रुग्णवाहिका मागवून तिला गंगापूरच्या रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती कम्युनिट सेंटरच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
No comments:
Post a Comment