पंढरपुरात आंदोलन; आंबेडकरांसह दीड हजार आंदोलकांवर गुन्हे
सोलापूर: मनाई असतानाही जमावबंदीचा आदेश झुगारून पंढरपुरात आंदोलन केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते यांच्यासह दीड हजार कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आंबेडकरांसह विठ्ठल मंदिरात प्रवेश करणाऱ्या १२ नेत्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी काल पंढरपुरात आंदोलन करत विठ्ठल मंदिरात प्रवेश केला होता. यावेळी प्रचंड गर्दी जमली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. जमावबंदी असतानाही हे आंदोलन झाल्याने पोलिसांनी काल उशिरा आंबेडकरांसह १२ प्रमुख नेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच इतर दीड हजार कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्यातील मंदिरं सुरू करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी पंढपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश करण्याच्या आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनात १ लाख वारकरी सामिल होणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. आंबेडकर यांच्या कालच्या आंदोलनात एक लाख वारकरी सहभागी झाले नव्हते. मात्र, वारकऱ्यांसह हजारो लोकांनी या आंदोलनात भाग घेतला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पंढरपुरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच पंढरपूरला येणारी एसटी सेवा बंद ठेवण्यात आली होती. तसेच मंदिराभोवती दहा फूट उंच बॅरिकेट्स लावण्यात आल्या होत्या. मात्र, आंदोलनात हजारो लोक सहभागी झाल्याने पोलिसांची तारांबळ उडाली होती. गर्दीमुळे पंढरपूर परिसरात रेटारेटी झाली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. या पार्श्वभूमीवर आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्यातील सर्व मंदिर , मशीद , बौद्ध मंदिर , गुरुद्वारा हे लवकरात लवकर भाविकांसाठी सुरु करण्यात येतील, असं अश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीनं आंदोलन मागे घेतलं आहे. राज्यातील सर्व मंदिर , मशीद , बौद्ध मंदिर , गुरुद्वारा हे येत्या १० दिवसांत उघडण्याचे आश्वासन शासनाकडून मिळाले असून यासाठी नियमावली बनविण्यात येणार आहे. सरकारनी दिलेल्या अश्वासनाप्रमाणे पुढील १० दिवसांत मंदिरे सर्वसामान्यांसाठी खुले न केल्यास पुन्हा रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. 'मुख्यमंत्र्यांनी जनभावनेचा आदर केला. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. राज्यातील प्रार्थनास्थळं लवकरच उघडली जातील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे,' असं प्रकाश आंबेडकर यांवेळी म्हणाले.
No comments:
Post a Comment