करोनाचा वेगवान प्रसार; ग्रामीण महाराष्ट्राने चिंता वाढवली - NEWS E HUB

Slider Widget

Saturday 29 August 2020

करोनाचा वेगवान प्रसार; ग्रामीण महाराष्ट्राने चिंता वाढवली


करोनाचा वेगवान प्रसार; ग्रामीण महाराष्ट्राने चिंता वाढवली

मुंबई : महाराष्ट्रासाठी सध्या सर्वात चिंतेची बाब म्हणजे पुरेशा आरोग्य सुविधा नसलेल्या ग्रामीण आणि निम शहरी भागात करोनाचा प्रसार वेगाने होत आहे. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार बहुतांश मृत्यू आणि २८ टक्के करोनाबाधित सध्या गावांमध्ये आणि निम शहरी भागात सापडत आहेत. शुक्रवारपर्यंतच्या ७.३ लाख केसेसपैकी २ लाख केसेस खेड्यांमधील आणि तालुक्यातील आहेत. तर उर्वरित ५.३ लाख केसेस २७ महापालिका क्षेत्रातील आहेत. मृतांच्या २३ हजार ४४४ एवढ्या आकडेवारीचं विश्लेषण करण्यात आलं. यापैकी २३ टक्के म्हणजेच ५ हजार ५०० मृत्यू हे ग्रामीण भागातील आहेत. तर उर्वरित १७ हजार ९४४ मृत्यू हे महापालिका क्षेत्रातील आहेत. बीड, उस्मानाबाद, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव आणि इतर जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रचंड कहर आहे. कोल्हापुरात महापालिका हद्दीच्या तुलनेत ग्रामीण भागात दुप्पट केसेस आहेत. शुक्रवारपर्यंत महापालिका हद्दीत ६०६४ केसेस होत्या, तर ग्रामीण भागातील केसेस १४ हजार २५५ एवढ्या आहेत. जिल्ह्यातील १०२४ पैकी ८४१ खेड्यांमध्ये सध्या करोनाचे रुग्ण आहेत. 'रुग्णांचा रस्त्यातच किंवा रुग्णालयात आणताच मृत्यू' भारतीय वैद्यकीय संघटनेच्या वरिष्ठ डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागात करोनाचा प्रसार झाल्यामुळे व्यवस्थापन करणं अत्यंत कठीण बनलं आहे आणि वेळेत उपचार देणं, निदान करणं शक्य होत नाही. नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या मते, २५ टक्के रुग्ण मृतावस्थेतच रुग्णालयात आणले जात आहेत, तर काही जणांचा रस्त्यातच मृत्यू होतो. काही जण ५ तासांवर असलेल्या अकोल्याहून येतात. बीड आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये खाजगी क्षेत्रानेही राज्य सरकारला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य तज्ञ डॉ. अभय बंग यांच्या मते, ग्रामीण भागात संसर्ग वाढणं अपेक्षितच होतं. पण गंभीर रुग्णांचं प्रमाण वाढणं ही चिंतेची बाब आहे. बंग सध्या गडचिरोलीत आहेत. गडचिरोलीत सध्या ८०० च्या आसपास केसेस आहेत. पण या केसेस ग्रामीण भागातून येत आहेत. डॉक्टरांनी आतापर्यंत चांगलं काम केलं आहे. पण चाचण्यांची क्षमता अपेक्षेपेक्षा खुपच कमी आहे. त्यामुळेच संसर्ग आणि मृत्यू दोन्हीमध्ये वाढ आहे, असं ते म्हणाले. स्थानिक ठिकाणी अनेक मृत्यूंची नोंदही केली जात नाही. त्यामुळे आजाराचं अचूक प्रमाण या भागात दिसत आहे. देशातील ६० ते ७० टक्के जनता ग्रामीण भागात राहते. त्यामुळे स्क्रीनिंगसाठी ग्रामीण भागात तातडीने व्यवस्था कार्यरत करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे मृत्यू वाढत असल्याचं सरकारला मान्य नाही. केसेस वाढत असल्या तरी गंभीर रुग्णांचं प्रमाण कमी आहे, असं वैद्यकीय अधिकारी आणि डॉ. प्रदीप आवटे म्हणाले. ऑक्सिजन तपासणीसाठी आशा वर्कर आणि सामाजिक कार्यकर्ते काम करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं. बीड सारख्या शहरात संपूर्ण खाजगी रुग्णालयांचं रुपांतर कोविड रुग्णालयात करण्यात आलं आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य सुविधा चांगल्या आहेत. तर महापालिका क्षेत्रांमध्ये खाजगी सुविधा चांगल्या आहेत. आपण परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारी आणि खाजगी दोन्ही सुविधा वापरत आहोत, असं आवटे यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील मृत्यू दर सध्या ३.१८ टक्के आहे. बीडमधील गायनोकॉलॉजिस्टच्या मते, मृत्यू दराचं विश्लेषण केल्यामुळे आपल्याला अचूक माहिती मिळेल. दुसरीकडे मुंबईतील रुग्णालये आता मुंबई महानगर प्रदेशातील रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. सायन रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील ४० टक्क्यांपेक्षा जास्त आयसीयू बेड आता एमएमआरमधील रुग्णांसाठी वापरले जात आहेत. अनेक जण रायगड, अलिबागमधून येतात, जिथे पुरेशा सुविधा नाहीत, असं डॉक्टर म्हणाले. सार्वजनिक आरोग्य सुविधेतील उणिवांचा आता त्रास होत असल्याचंही ते म्हणाले. सार्वजनिक आरोग्य विश्लेषक रवी दुग्गल यांनी यापूर्वी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, राज्य आपल्या जीडीपीच्या तुलनेत आरोग्य सुविधेवर फक्त ०.५ टक्के एवढा खर्च करतं, जे राष्ट्रीय सरासरीच्या निम्म आहे. मुंबई सध्या १.४२ लाख रुग्णांसह सर्वाधिक बाधित महापालिका क्षेत्र आहे. यानंतर पुणे (९६ हजार ६९२) आणि पिंपरी चिंचवड (४५०९३) यांचा क्रमांक लागतो.

No comments:

Post a Comment