दार उघडा उद्धवा... मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी भाजप रस्त्यावर
नाशिक: लॉकडाऊनमुळे गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षानं राज्यभर आंदोलन सुरू केलं आहे. पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर अशा सर्वच ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आज रस्त्यावर आले व त्यांनी सरकारचा निषेध करत घंटानाद केला. 'दार उघडा उद्धवा' अशा घोषणाही दिल्या. राज्यात अनलॉक सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्यानं सर्व व्यवहार सुरळीत झाले. शाळा व लोकल गाड्या वगळता सर्व काही खुले करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मंदिरे अजूनही बंद आहेत. राज्यातील अनेक देवस्थानाचा अर्थकारणाशी मोठा संबंध आहे. देवस्थानच्या ठिकाणी चालणाऱ्या विविध व्यवसांयावर राज्यातील लाखो कुटुंबांची उपजीविका चालते. त्यामुळं मंदिरं उघडण्यास परवानगी दिली जावी, अशी भाजपची मागणी आहे. या मागणीला विश्व हिंदू परिषद, अध्यात्मिक समन्वय आघाडी, अखिल भारतीय संत समिती, अखिल भारतीय वारकरी मंडळ, वारकरी महामंडळ, अखिल भारतीय पुरोहित संघ, जय बाबाजी भक्त परिवार यांसह अनेक धार्मिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. वाचा: नाशिकमध्ये रामकुंडावर घंटानाद करण्यात आला. कपालेश्वर मंदिराच्या पायरीवर जाण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. पोलिसांनी त्यांना अटकाव केल्यामुळं आक्रमक झालेले आंदोलक विरोध झुगारून आत शिरले. त्यामुळं तणाव निर्माण झाला होता. अहमदनगरमध्ये नगरचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरासमोर, गौरी घुमट येथील तुळजाभवानी मातेच्या मंदिराबाहेर करण्यात आले. कोल्हापुरात अंबाबाईच्या मंदिरासह इतर मंदिरे खुली करण्याची मागणी करण्यात आली. नागपूरमध्ये बेसा येथील स्वामी समर्थ मंदिरापुढे 'दार उघडा उद्धवा' आंदोलन करण्यात आले. पुण्यात खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. शिर्डी येथील आंदोलनात भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील, नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. वाचा:
No comments:
Post a Comment