दूध उत्पादकांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या दुग्धविकास मंत्र्यांवर गुन्हा कधी?: राजू शेट्टी
मुंबईः 'दुधाला भाव मिळाला नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्या रेवनाथ काळेच्या आत्महत्येबद्दल चर्चा नाही पण, एक अभिनेता ज्याने गांजा घेतल्याचं बोललं जातं, त्या अभिनेत्याच्या आत्महत्येची चर्चा होते, हे दुर्दैवी आहे,' असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यांनी व्यक्त केली आहे. दुध दर, दुधावरील जीएसटी रद्द करावी अशा विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी संघटनेचे दुध दर आंदोलन सुरु केले आहे. अलीकडेच राजू शेट्टी यांच्यासह प्रमुख ११ आयोजक व अन्य ४० ते ५० जणांविरोधात बारामतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरही राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'आमच्यासाठी गुन्हे नवीन नाहीत, आणखी एका गुन्ह्याची भर, दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी मोर्चा काढला आहे. मोर्चात गायीचा छळ केल्याचा आरोप हास्यास्पद आहे. कितीही गुन्हे दाखल करा आंदोलन करणार,' असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे. 'दूध उत्पादक शेतकरी गेल्या दोन अडीच महिन्यांपासून, सातत्याने आंदोलन करत आहे. उत्पादन खर्चापेक्षा १५ रुपये कमी दराने तो दूध विकत आहे. त्यावेळी कोणाला दया आली नाही. दूध उत्पादकांनी दुधाचा धंदा परवडत नाही, म्हणून आत्महत्या केल्या. त्या आत्महत्यांना जबाबदार म्हणून राज्याच्या दुग्धविकास मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं पोलिसांना वाटलं नाही. परंतु, परवानगी नसताना मोर्चा काढला म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल होत असेल, तर होय आम्ही गुन्हा केलेला आहे. पोलिसांना जे काय करायचं ते करावं, सरकारला जे काय करायचं ते करावं. अजूनही आम्ही गप्प बसणार नाही. जोपर्यंत दूध उत्पादकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा कायदा हातात घेऊन आम्ही आंदोलन करणार, असा आक्रमक पवित्रा राजू शेट्टी यांनी घेतला आहे.' तसा व्हिडिओ देखील त्यांनी ट्विट केला आहे.
No comments:
Post a Comment